RTE घोटाळ्यात ‘इनसाइड सेटिंग’चा संशय, चौकशीपूर्वीच ‘सूचना’ देण्याचा धक्कादायक प्रकार ; अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप !

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूजसह माळशिरस तालुक्यात चर्चेत असलेल्या शिक्षणाचा हक्क (RTE) प्रवेश घोटाळ्याने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, माळशिरस पंचायत समिती मधील शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची संशयास्पद भूमिका चर्चेत आली आहे. बनावट कागदपत्रे व खोटे भाडेकरार सादर करणाऱ्या पालकांबरोबर “अंतर्गत सेटिंग” असल्याची जोरदार शंका व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका सजग पालकाने तक्रार दाखल केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगितले जात असले, तरी ती केवळ दिखाऊ असल्याचा आरोप होत आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीसाठी जाण्यापूर्वीच संबंधितांना “तयारीत रहा” अशा प्रकारची पूर्वसूचना देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. यामुळे संपूर्ण चौकशी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“ज्यांनी नियम मोडले, त्यांनाच संरक्षण का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय अधिक गडद होत चालला आहे.
दरम्यान, गरजवंत व पात्र पालकांच्या मुलांना RTE अंतर्गत प्रवेश मिळणे अपेक्षित असताना, धनदांडग्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. “गरिबांच्या हक्कावर डाका टाकणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही?” हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.
स्थानिक नागरिक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दोषी अधिकारी, कर्मचारी आणि गैरप्रकार करणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करावी, अशी मागणी होत आहे.
आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, आणि खरोखरच या ‘इनसाइड सेटिंग’चा पर्दाफाश होतो का, याकडे संपूर्ण अकलूज-माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.



