संघर्षाला मिळतोय जनतेचा आशीर्वाद ; “दादा, तुम्ही काळजी घ्या…” — चिमुकलीची आर्त विनंती…. अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनाला जनतेचा भावनिक पाठिंबा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
पंढरपूर : पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून, आता हा पाठिंबा केवळ राजकीय न राहता भावनिक स्वरूप धारण करताना दिसत आहे. एका चिमुकलीने लिहिलेल्या हस्तलिखित पत्राने आणि शेतकरी बांधवांनी पाठविलेल्या पत्राने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
आश्रया आशीष निंबोरे या लहान मुलीने रोहित पवार यांना लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांसाठी उपाशी राहणाऱ्या नेत्याबद्दलचा आदर आणि काळजी व्यक्त केली आहे. “दादा, तुम्ही दोन दिवसांपासून अन्नाचा एकही घास खाल्लेला नाही, हे ऐकून मला खूप वाईट वाटलं,” असे लिहिताना तिने आपल्या भावना शब्दांत मांडल्या आहेत.
शेतकरी आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो आणि त्याच्या न्यायासाठी तुम्ही स्वतःच्या भुकेची पर्वा न करता लढत आहात, याबद्दल तिने रोहित पवार यांना सलाम केला आहे. “तुम्ही एकटे नाही, महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे,” असे सांगत तिने विठुरायाकडे त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
औरंगा येथील शेतकरी बांधवांनी पाठविलेल्या पत्रात रोहित पवार यांच्या संघर्षशील नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले आहे. “राज्यात कुठेही एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय झाला, एखादा तरुण अडचणीत सापडला किंवा एखाद्या महिलेला न्यायाची गरज भासली, तर सर्वप्रथम आठवणारे नाव म्हणजे रोहित पवार,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
पत्रात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या वेदना स्वतःच्या अंगावर घेऊन उपाशी राहण्याचा निर्णय प्रत्येक नेता घेत नाही. त्यासाठी संवेदनशील मन, अन्यायाविरोधात उभे राहण्याचे धैर्य आणि समाजाप्रती बांधिलकी लागते. त्यामुळेच लाखो शेतकरी आज रोहित पवार यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाला प्रशासन आणि सरकारकडून विविध अडचणी निर्माण होत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, सामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला आणि शेतकरी वर्गातून मिळणारा भावनिक पाठिंबा आंदोलनाला नवे बळ देत आहे. विशेष म्हणजे एका चिमुकलीच्या हस्ताक्षरातील निरागस शब्द आणि शेतकरी बांधवांच्या भावना या आंदोलनाला केवळ राजकीय रंग न देता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून देत असल्याचे चित्र दिसत आहे.
या दोन्ही पत्रांमधून एकच संदेश स्पष्टपणे समोर येतो — शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला जनतेचा पाठिंबा आहे आणि रोहित पवार यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत हा संघर्ष सुरू ठेवावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. चिमुकलीच्या “दादा, तुम्ही काळजी घ्या…” या निरागस सादेपासून ते शेतकरी बांधवांच्या “तुम्ही एकटे नाही” या विश्वासापर्यंतचा हा भावनिक प्रवास सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.



