Latest News

बेकायदा डेअरी बंद, अडीच लाखांचा तेलसाठा जप्त; माळशिरस तालुक्यात भेसळखोरांवर FDAचा बडगा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळ, अनधिकृत अन्न व्यवसाय आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातील कारवायांना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी धडक कारवाई करत एका बेकायदा दूध संकलन केंद्राचा व्यवसाय बंद केला, तर दुसऱ्या कारवाईत अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित पामोलिन तेलसाठा जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी पिसेवाडी (ता. माळशिरस) येथील मे. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राची तपासणी केली असता संबंधित व्यवसाय अन्न व औषध प्रशासनाचा आवश्यक परवाना न घेता सुरू असल्याचे आढळून आले. याबाबत संबंधित मालक गणेश काळे पाटील यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत सुरक्षित अन्न पुरवठ्याशी संबंधित अनेक तरतुदींचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दूध डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या कारवाईत अकलूज येथील जयकुमार दुलचंद दोशी यांच्या पेढीची तपासणी करण्यात आली. यावेळी कमी दर्जा अथवा लेबलदोष असल्याच्या संशयावरून तब्बल 997 किलो पामोलिन तेलाचा साठा, अंदाजे 2 लाख 44 हजार 700 रुपये किमतीचा माल, जप्त करण्यात आला. पुढील आदेश होईपर्यंत हा साठा विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल, परवान्याविना सुरू असलेले अन्न व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थांतील गैरप्रकार, गुटखा याबाबतच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. विविध स्तरांवरून तक्रारी होत असूनही अशा प्रकारच्या कारवाया फारशा दिसून येत नव्हत्या. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा स्थानिक कारभार अनेकदा प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात सापडला होता.

जिल्ह्यातील अनेक भागांत भेसळीचे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असताना संबंधित यंत्रणा मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्यासारखी भूमिका घेत असल्याची टीका नागरिकांकडून होत होती. अनेक प्रकरणांमध्ये तक्रारी असूनही तपास आणि कारवाई होत नसल्याने भेसळखोरांचे फावले असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली होती.

मात्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात सुरू झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक प्रशासनही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील या दोन कारवाया त्याच मोहिमेचा भाग मानल्या जात असून, या कारवायांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

तथापि, केवळ दोन कारवायांवर समाधान मानण्याऐवजी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील इतर संशयित अन्न व्यवसाय, दूध डेअऱ्या, तेल विक्रेते, मिठाई उत्पादक आणि भेसळीच्या साखळ्यांवरही सातत्याने धडक कारवाया होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या कारवाया केवळ दिखाऊ न राहता व्यापक मोहिमेत रूपांतरित झाल्यासच ग्राहकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न मिळण्याची हमी मिळू शकणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!