आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; माळशिरस तालुक्यासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
राज्याच्या अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पूल, तलाठी कार्यालये, न्यायालय इमारत, दुय्यम निबंधक कार्यालय, शासकीय विश्रामगृह तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती अशा विविध विकासकामांसाठी ९० कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे तालुक्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या दुरुस्ती आणि नव्या पुलांच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी नव्या तलाठी कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय माळशिरस सत्र न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व नोंदणी व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी अकलूज येथे दुय्यम निबंधक कार्यालयासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारी अधिकारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी माळशिरस व पिलीव येथे शासकीय विश्रामगृह उभारण्यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.
मागील काळात अतिवृष्टीमुळे गणेशगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या (को.प.) बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. या निधीमुळे माळशिरस तालुक्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच सुनेत्राताई पवार आणि महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले.



