३० वर्षांचा पाणीप्रश्न अखेर मार्गी; आ.अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून जाधववाडी गावठाण तलावासाठी आठ दिवसांत पाईपलाईन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
पंढरपूर : जाधववाडी-मोडनिंब येथील गावठाण तलाव भरून संपूर्ण गावाला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामस्थ गेल्या ३० वर्षांपासून संघर्ष करत होते. अखेर या प्रलंबित पाणीप्रश्नाला आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या पुढाकारातून प्रत्यक्ष कामाची दिशा मिळाली असून, ग्रामस्थांच्या मागणीनंतर अवघ्या आठ दिवसांत पाईपलाईन जाधववाडीपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जाधववाडी येथील ग्रामस्थांनी आमदार अभिजीत आबा पाटील यांची भेट घेऊन गावठाण तलावासाठी पाईपलाईन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांची मागणी ऐकून घेत आमदार पाटील यांनी तातडीने संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या आठ दिवसांत पाईपलाईन जाधववाडीपर्यंत पोहोचली.
या पाईपलाईनच्या माध्यमातून गावठाण तलावात पाणी आणणे शक्य होणार असून, जाधववाडीसह परिसरातील आजूबाजूच्या गावांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाला आता प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून मार्ग मिळाला आहे.
ग्रामस्थांची मागणी, आमदारांचा तातडीचा पाठपुरावा आणि अवघ्या आठ दिवसांत प्रत्यक्ष पाईपलाईन, यामुळे जाधववाडी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या पाईपलाईनचे पूजन आज ज्येष्ठ नेते भारत आबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबुतात्या सुर्वे, पंचायत समिती सदस्य बालाजी पाटील, कुरण गिड्डे, शिवाजी सुर्वे, नितीन गडधरे, संतोष दळवी, प्रवीण माने, विठ्ठल मोरे, सौदागर जाधव, राजकुमार जाधव, अभिजीत जाधव, उदय जाधव, संतोष मुटकुळे, संभाजी काळे, अख्तर तांबोळी, निलेश काळे, महादेव मोरे, अरुण सोमासे, नंदकुमार लादे, बाळासाहेब सोमासे, गंगाधर जाधव, माने महाराज, अंकुश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
जाधववाडीच्या पाणीप्रश्नासाठी तातडीने पुढाकार घेत पाईपलाईन उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार अभिजीत आबा पाटील यांचे आभार मानले.



