Latest News

बापरे…! १७ पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना बेड्या ; अकलूज पोलिसांचा मोठी कारवाई

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज: सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अकलूज पोलीस ठाण्याने बेकायदेशीर अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्रीराम पोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, विकास कैलास वजाळे (रा. परीते, ता. माढा) हा टाटा नेक्सॉन कारमधून बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी अकलूज ते टेंभुर्णी रस्त्यावरील संगम गावच्या हद्दीत येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून विकास वजाळे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ जिवंत काडतुसे आणि नेक्सॉन कार हस्तगत करण्यात आली.

पोलिसी खाक्या दाखवून केलेल्या कसून चौकशीत त्याने हे शस्त्रसाठे राहुल सतीश माने (रा. मिरज, जि. सांगली) आणि मध्य प्रदेशातील मुख्य पुरवठादार अनिल पंचलाल मेहता (रा. रांजणगाव, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांच्याकडून आणल्याची कबुली दिली. तसेच ही पिस्तुले सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील विविध व्यक्तींना विकल्याचे उघड केले. पोलिसांनी लागलीच पुढील कारवाई करत महादेव बाळासाहेब कोरके (रा. करकंब), विजय सदाशिव किरणगी (रा. बेळगाव, कर्नाटक), सुमित नाना लवटे (रा. सांगोला) यांच्याकडून प्रत्येकी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याशिवाय फरार आरोपी प्रदीप माने आणि शनी बनसोडे यांच्या घरांची झडती घेऊन त्यांच्याकडूनही प्रत्येकी एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

दरम्यान, मुख्य पुरवठादार अनिल मेहता हा सोनगीर (जि. धुळे) येथे शस्त्रे देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धुळे गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्याकडून ४ पिस्तुले आणि २५ जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्या मदतीने या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राहुल सतीश माने याला टेंभुर्णी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. राहुल मानेकडून पोलिसांनी आणखी ६ पिस्तुले व ८ काडतुसे जप्त केली. आरोपी राहुल माने हा सांगलीच्या उमदी पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात आधीपासूनच फरार होता.

या कारवाईत पोलिसांनी विकास वजाळे, राहुल माने, महादेव कोरके, विजय किरणगी, अनिल मेहता आणि सुमित लवटे या सहा जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सपोनि विक्रम साळुंखे, सपोनि अंकुश वाघमोडे, पोउपनि विशाल कदम व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विक्रम साळुंखे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!