Latest News

बचतगट आणि भिशीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा; वेगळ्या फायद्याचे आमिष दाखवत सभासदांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

वेळापूर : बचतगट आणि भिशीच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवत सभासदांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार वेळापूर परिसरात समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल २ कोटी १० लाख ९३ हजार ५४० रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संग्राममाने बचतगट व भिशीच्या नावाखाली सभासदांना विविध फायदे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच बचतगट व भिशीचे रजिस्ट्रेशन असल्याचे सांगून सभासदांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर बचतगट व भिशीच्या सभासदांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली.

या प्रकरणात बचतगट व भिशीच्या सभासदांकडून एकूण २ कोटी १० लाख ९३ हजार ५४० रुपये जमा करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या रकमेतून काही रक्कम अपहार करून फिर्यादीसह इतर सभासदांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तसेच आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सभासदांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी माधव शाहू चव्हाण (वय ५६, रा. तोंडले, ता. माळशिरस), यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात त्यांची ५ लाख १२ हजार ४३० रुपयांची फसवणूक झाली आहे.

या प्रकरणी ब्रह्मदेव केशव मोरे (वय 64, तोडले ता. माळशिरस) अनिल अशोक गुजरे (वय ४१, तोडले ता. माळशिरस) आणि अनिकेत ब्रह्मदेव मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार १५ जानेवारी २०२० ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 BNS 3(5),316(2),316 ( 4),316(5),318 (2) ,318 (4) महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरंक्षण) अधिनियम, १९९९ 3,4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास API आशिष कांबळे करीत आहेत.

बचतगट आणि भिशीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी संबंधित संस्थेची नोंदणी, आर्थिक व्यवहार आणि अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button