माढा हमेशा हमारा था और हमारा रहेगा… क्योंकी हम यहाँ के पुराणे खिलाडी है ।माढ्यातील राजकीय घडामोडी मुळे ‘रेस’ सिनेमातील डायलॉगची आठवण
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : “रेस हमेशा मेरी थी और मेरी ही रहेगी क्योंकी मै इस खेल का पुराणा खिलाडी हूँ…” साधारणपणे 15 ते 16 वर्षापूर्वी आलेल्या ‘रेस’ या हिंदी सिनेमातील डायलॉगची चर्चा सध्या सगळीकडे ऐकायला मिळू लागली आहे. त्याला कारण म्हणजे माढा लोकसभा मतदार संघात घडत असलेल्या राजकीय घडामोडी.
माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरची नाराजी व त्यांच्या विरोधात असलेले वातावरण लक्षात घेता गेल्या सात-आठ महिन्यांपासून मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. केवळ राज्यातच नाही तर देशभरात या मतदार संघाविषयी चर्चा सुरू झाल्या. अगदी टप्प्या-टप्प्यावर राजकारण बदलत गेले… सस्पेन्स वाढत गेले… एखादा चित्रपट पाहताना जसा शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो अगदी त्या प्रमाणे माढ्या बाबतचे वातावरण तयार झाले होते.
अखेर त्यावर पडदा पडला आणि एक एक या महानाट्यांचे एक एक पात्र समोर येऊ लागले. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेसाठी ईच्छा व्यक्त केल्यापासून सुरूवात झालेल्या या महानाट्याचा शेवट काल उत्तम जानकार यांच्या रूपाने झाला असं सध्या तरी दिसत आहे. दरम्यानच्या काळात ज्या राजकीय उलथापालथी झाल्या त्या उत्कंठा वाढवणार्या होत्या… धैर्यशील मोहिते-पाटील खरंच निवडणूक लढवणार का? भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट देणार का? तिकीट नाही मिळाल्यास धैर्यशील कोणता निर्णय घेणार? अपक्ष लढणार का?
इथंपर्यंत सुरू असलेल्या कथानकात अचानक शरद पवार यांच्या तुतारीची एंट्री झाली. भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहिर केले आणि माढा मतदार संघातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते ‘तुतारीचा’ सुर आळवायला लागले. मग पुन्हा भैय्या तुतारी घेणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? यानंतर अगदी रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी ‘शिवरत्न’ ला भेट दिल्यानंतर तर उत्कंठा अधिकच वाढली.
अखेर काही कालावधीत शरद पवार व सुशिल कुमार शिंदे यांच्या दौर्याने यावर पडदा पडला व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशही झाला आणि तिकीटही जाहिर झाले. परंतु हे कथानक इथेच संपले नाही. याचा कदाचित अँटी क्लायमॅक्स आणखी बाकी होता. तो पूर्ण केला उत्तम जानकर यांनी. तब्बल चाळीस वर्षे मोहिते-पाटलांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून माळशिरस तालुक्यात राजकारण केलेल्या उत्तम जानकर यांनी मोहिते-पाटलांशी केलेली हात मिळवणी तर अचंबित करणारी होती.
दरम्यान जानकर यांनी आपल्या भाषणात जो मुद्दा मांडला त्यामुळे तर खरोखरच ‘रेस’ या हिंदी चिटपटाची आठवण झाली. जानकर म्हणाले, “माझे आणि धैर्यशील भैय्यांचे सहा महिन्यापुर्वीच ठरले होते…’ हे ऐकुन ‘या जगात सर्व काही पूर्व नियोजित आहे’ हा डायलॉगची आठवण तर झालीच त्याच बरोबर “तुमने वही देखा जो मै तुम्हे दिखाना चाहता था…. प्लॅन तुम्हारा नही मेरा चल रहा था…!” हा डायलॉग अगदी चपखल पणे धैर्यशील भैय्यांना लागू झाला.
रेस हा पण एक सस्पेन्स चित्रपट होता त्यामुळे त्यातीलच “रेस हमेशा मेरी थी और मेरी ही रहेगी क्योंकी मै इस खेल का पुराणा खिलाडी हूँ…” “तुम कभी जित नही पाये क्योंकी तुम हमेशा मुझे हराने की सोचते थे … और मै कभी हारा नही क्योंकी मै हमेशा जितने की सोचता था…” हे डायलॉगही धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सध्याच्या राजकीय खेळीला मिळते जुळते असल्याचीही चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.