अवाजवी बिल, सदोष वीज मीटरमुळे ग्राहक हैराण ; नियमित विज बिल भरणार्याला तब्बल 12 हजार रूपयांचे बिल
महर्षि डिजीटाल न्यूज
अकलूज : अगोदरच विजेचा लपंडाव, विज चोरी, वायरमन व स्थानिक अधिकार्यांच्या मनमानी कारभारा त्रासामुळे हैराण झालेल्या महावितरणच्या ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या तुलनेत अवाच्या सव्वा वीज बिल येत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याशिवाय सदोष वीज मीटरने ग्राहकांना त्रस्त केले आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण ठराविक कालावधीत केले जात नाही. अनेकदा हेलपाटे मारल्यानंतरही बहुतांश कार्यालायत समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने महावितरणच्या कारभारावर वीज ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.
वीजप्रवाह खंडित झाला. वीजपुरवठा करणार्या विद्युत खांबावरील फ्यूज निकामी झाली. मुख्य वीज वाहिनी ते ग्राहकांच्या मीटरवर जाणारी सर्व्हिस वायर पडली. कमी दाबाने वीज पुरवठा होणे, मुख्य कनेक्शनच्या वायरवर कार्बन येणे, वीज बिल मुदतीत वाटप होत नाही. चिरीमिरी दिल्याशिवाय किरकोळ कामे होत नाही अशा अनेक तक्रारी ग्राहकांच्या असताना आता वाढीव वीज बिलाने संताप व्यक्त केला जात आहे.
यशवंतनगर येथील नियमित वीज बिल भरणारे धाईंजे भीमराव तात्याबा यांना जून महिन्यात तब्बल 12 हजार एकशे साठ रूपये विज बिल आल्याने त्यांना अक्षरश: शॉक बसला आहे. धाईंजे यांच्यासारखी अनेक उदाहरणे अकलूज व यशतंनगर परिसरात पहायला मिळत असून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नेमके काय करावे? असा प्रश्न त्यांना सतावताना दिसत आहे.
एकीकडे वीज चोरी करणारे मोकाट व बिनधास्त असताना नियमित वीज बिल भरणार्या ग्राहकांना अशाप्रकारे वाढीव वीज बिले देऊन महावितरण त्यांची सत्वपरिक्षाच बघत आहे. संबंधित नागरीकांनी टोकाचे पाऊल उचलण्याअगोदर वरीष्ठ अधिकार्यांनी याबाबत खुलासा करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी यानिमित्ताने करण्यात येत आहे.



