नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; अकलूज नगरपरिषदेच्या वतीने सयाजीराजे मोहिते पाटील यांच्याकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) व अकलूज नगरपरिषदेच्या वतीने प्रांत कार्यालय, अकलूज येथे नायब तहसीलदार चंदनशिवे यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सौ. रेश्माताई लालासाहेब अडगळे आणि गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक विशाल मोरे, पुथ्वीराज आंबुरे, आझर शेख, योगेश गांधी, लालासाहेब अडगळे, लखन गायकवाड, राजेद्र फुले, परशुराम बनपट्टे, विकी विटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
- नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व तातडीने चौकशी करावी.
- गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
- आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.
- भविष्यात अशा प्रकारच्या परीक्षा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी प्रभावी, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभारावी.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) व अकलूज नगरपरिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे, त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राखणे हीच आपली ठाम भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले.



