संस्थेचे संचालक बनले जनतेचे प्रतिनिधी; रत्नप्रभादेवी बिजोत्पादक संस्थेत विजयी मान्यवरांचा दिमाखदार सत्कार

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने विविध निवडणुकांत यश संपादन केलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, सन्मानित करण्यात आलेले सर्व मान्यवर हे संस्थेचेच संचालक असून, त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करत विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषद गट बोरगाव येथून निवडून आलेले नागेश भोसले, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी चेअरमन व संचालक विलास शिरसागर तसेच पंचायत समिती गण माळीनगर येथून निवडून आलेले संचालक महादेव साबळे यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
या वेळी विलास शिरसागर यांचा सन्मान चेअरमन श्रीकांत देशमुख यांनी, नागेश भोसले यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष सुजित तरंगे यांनी, तर महादेव साबळे यांचा सन्मान संचालक इंद्रराज जोशी यांनी केला. कार्यक्रमादरम्यान संस्थेचे उपाध्यक्ष सुजित तरंगे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
यावेळी संचालक संदीप घाडगे, सागर यादव, दादा तोडकरी, व्यवस्थापक दिलीप सिरसट यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जांबुड तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन घाडगे यांनीही उपस्थिती लावली.
संस्थेचा कारभार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या सुरू असून संस्था प्रगतीपथावर कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



