Latest News

अकलूजमध्ये गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश! महिला पोलिसांवर हल्ला करून आरोपींचा पोबारा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : अकलूज परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पोलिसांनी रचलेला सापळा उधळण्याचा प्रयत्न झाला. डमी ग्राहक म्हणून गेलेल्या दोन महिला पोलिसांना आरोपींनी मारहाण करून पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणला आणि गोंधळाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना दि. 18 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांना अकलूज परिसरात गर्भलिंग निदान चाचणी केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत पी.एस.आय. सोनाली मोरे आणि पोलीस हवालदार अलका कदम यांना डमी ग्राहक म्हणून पाठविले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भलिंग निदानासाठी येणाऱ्या महिलांना अकलूजमधील संग्रामनगर-नऊचारी परिसरातून वाहनातून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार डमी ग्राहक म्हणून गेलेल्या दोन्ही महिला पोलिसांना आरोपींनी वाहनात बसवून माण तालुक्यातील पळशी (म्हसवड) येथे नेले.

पळशी येथे गर्भलिंग निदान चाचणी करण्याची तयारी सुरू असतानाच आरोपींना या दोन्ही महिला पोलिस असल्याचा संशय आला. त्यानंतर आरोपींनी दोन्ही महिला पोलिसांशी झटापट करत त्यांना मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केला आणि संधी साधून घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी पोलीस हवालदार अलका कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात महेश नंदकुमार खाडे (रा. पळशी, ता. माण), नंदकुमार खाडे यांची आई, दोन अनोळखी पुरुष आणि दोन अनोळखी महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी संतोष वाळके करीत आहेत.

बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या तसेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिला आहे.

गर्भलिंग निदानासारख्या गंभीर आणि बेकायदेशीर प्रकाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, फरार आरोपींच्या शोधाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button