शिवरत्न सभागृहाचे नाव बदलणार नाही; शासनाच्या परवानगीशिवाय नामांतरास ‘ब्रेक’

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील ‘शिवरत्न सभागृह’ नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या सभेत माळशिरस तालुक्यातील सदस्य आक्रमक झाले. ‘शिवरत्न’ हे नाव बदलण्याचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल उपस्थित करत नामांतराला तीव्र विरोध करण्यात आला. दरम्यान, शासनाच्या परवानगीशिवाय ‘शिवरत्न सभागृहाचे’ नाव बदलले जाणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या नामांतराला सध्या ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेची सभा अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होत असताना ‘शिवरत्न सभागृह’ नामांतराचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला. माळशिरस तालुक्यातील सदस्यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला.
जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी ‘शिवरत्न सभागृह’चे नाव बदलण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला. सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यकाळात या सभागृहाला ‘शिवरत्न’ असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे या ऐतिहासिक नावात बदल करण्याची गरज काय, असा सवालही सदस्यांकडून करण्यात आला.
यावर उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी नामांतराचा विषय शासनाकडे पाठविण्यात येणार असून, शासनाची परवानगी मिळाल्याशिवाय सभागृहाच्या नावात कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील ‘शिवरत्न सभागृह’चे नाव बदलून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्याचा ठराव ऑगस्ट २०२६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी मांडलेला ठराव मंजूर झाल्यानंतर या निर्णयाला राजकीय विरोध सुरू झाला.
मोहिते-पाटील समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच संभाजी ब्रिगेडने या नामांतराला विरोध दर्शवून ‘शिवरत्न’ हे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
‘शिवरत्न’ हे नाव बदलण्याच्या निर्णयावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असतानाच जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाच्या परवानगीशिवाय नामांतर होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या विषयाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे ‘शिवरत्न सभागृह’चे नाव कायम राहणार की ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण होणार, याचा अंतिम निर्णय आता शासनाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, माळशिरस तालुक्यातील सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभेत पुन्हा ऐरणीवर आला असून, शासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



