Latest News

नितीन गडकरींच्या हस्ते ‘सहकार महर्षी’ला राष्ट्रीय पुरस्कार; स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी स्वीकारला सन्मान

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज या कारखान्याने ऊस विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. सन २०२५-२६ या गळीत हंगामातील कामगिरीबद्दल राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्या वतीने कारखान्यास ‘ऊस विकासाकरिता उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता तृतीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गुजरातचे सहकार मंत्री गुरजर साहेब, हरियाणाचे मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कारखान्याच्या वतीने संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, कु. इशिता धैर्यशील मोहिते-पाटील, उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, संचालक नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, संचालिका सुजाता शिंदे, कार्यकारी संचालक सुहास यादव आणि मुख्य शेतकी अधिकारी रविराज चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कारखान्याने ऊस विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे तसेच उच्च साखर उतारा मिळविण्यासाठी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ही राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी साध्य झाली आहे. या पुरस्कारामुळे अकलूजच्या सहकार क्षेत्राच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानामुळे संचालक मंडळ, सभासद, शेतकरी आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button